कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : फेटे बांधून फुलांची
उधळण ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासीयांचे वळीवडे येथे
स्वागत केले. ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासीयांनी आपल्या स्मृतिंना उजाळा
दिला. या भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूर परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक,
पर्यटन यामध्ये आदान-प्रदान केले जाईल. दिल्लीप्रमाणे वार्सा ते मुंबई थेट हवाई
वाहतूक सुरु करु, असे आश्वासन पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज
यांनी दिली.
वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या
प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण श्री प्रीझीदॅज यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, जिल्हा
परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की, पोलिश एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की,
कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
यानंतर झालेल्या सोहळ्याची सुरुवात दोन्ही
देशांच्या राष्ट्रगीताने झाली. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सुरुवातीला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांचे स्वागत करुन या ऐतिहासिक आणि
भावनिक सोहळ्याची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, कोल्हापूरकरांचे अभिवादन
करण्यासाठी पोलंडचे हे शिष्टमंडळ इथे आले आहे. 1943 ते 1948 या पाच वर्षाच्या
काळात पाच हजार पोलंडवासीय वळीवडे येथे छोट्या पोलंड देशाच्या स्वरुपात राहायला
होते. या काळात इथली संस्कृती, इथले नियम त्यांनी शिस्तप्रीय पद्धतीने स्वीकारले
होते. या वास्तव्याला पोलंडवासीय आपले दुसरं घर मानतात. या ऐतिहासिक ठिकाणी लवकरच
संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मानवतेचा संदेश देणारे हे संग्रहालय असेल.
प्रधान सचिव श्री. गगराणी म्हणाले, ऐतिहासिक
आणि भावनिक सोहळ्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संकल्पना
मुख्यमंत्र्यांना खूप आवडली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने दिले.
दुसऱ्या महायुद्धात सर्वाधिक जास्त नुकसान पोलंडचे झाले. इतिहासामधून दोन वेळा
नामशेष करण्याचा प्रयत्न झालेला हा देश. अशा या देशातून ते आपल्या देशात येवून
राहिले. परत-परत या ठिकाणी यावे लागतय अशा भावनिक ठिकाणी संग्रहालयाची निर्मिती
होतेय. कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रेम आणि आपुलकी दिली. त्याबद्धल त्यांचे आभारही
त्यांनी यावेळी मानले.
उप परराष्ट्र मंत्री श्री प्रीझीदॅज म्हणाले, कोल्हापूरकरांनी
दिलेल्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. दुसऱ्या महायुद्धामध्ये 90 टक्के शहर
उद्धवस्त झाले होते. भारतातील गुजरातमधील जामनगर आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर
येथील महाराजांनी पोलंडवासियांना आश्रय दिला. केवळ आश्रयच दिला नाही तर त्यांच्यासाठी
लागवणाऱ्या सेवा सुविधा यांचाही समावेश होता. वळीवडे येथे एक छोटासा पोलंड देश
अस्तित्वात होता. कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल, दाखविलेल्या मानवतेच्या
भावनेबद्दल मी पोलंडच्यावतीने आभार मानतो. येथे होणारे संग्रहालय हे मानवतेचे
प्रतिक असेल. या भावनिक नात्याबरोबरच पोलंड भारतातील विशेषत: कोल्हापूर परिसरातील
उद्योगामध्ये आदान-प्रदान करेल. वार्सा ते दिल्ली नंतर मुंबई व पुणे येथेही थेट
हवाई वाहतूक सुरु केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
चमका कोल्हापूर हमारा....
"नमस्ते
कोल्हापूर ! मेरे भाईयों और बहनों आज का लम्हा बहुत बहुत महत्वपूर्ण है",
असे सांगत राजदूत ॲडम बूरॉकोस्की यांनी हिंदीत भाषणाला सुरुवात केली. दुसऱ्या
महायुद्धाच्या काळात देशाची झालेली हानी आणि आशा काळात भारताने विशेषत:
कोल्हापूरकरांनी मानवतेच्या भावनेतून दिलेला आश्रय आणि संरक्षण या विषयी मानावे
तेवढे आभार थोडेच आहेत. यावेळी मला अटलबिहारी वाजपेयी यांची एक कविता आठवते.
दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर
अंधियारा
किंतु
चिर कर तम की छाती, चमका हिंदुस्था हमारा
असे सांगून
चमका
कोल्हापूर हमारा असे उच्चारताच उपस्थितानी टाळ्यांच्या
कडकडाटात दाद दिली.
|
नमस्कार,
अशी चक्क मराठीतून सुरुवात करत कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक यांनी मराठीतून भाषण
केले. राजर्षी शाहू महाराजांनी
पोलंडवासियांना संरक्षण दिले. इथल्या
मातीतला दयाळूपणा, नागरिकांची सद्भावना पोलंडवासिय सदैव आठवणीत ठेवतील. राजर्षी
शाहू महाराजांचा हाच वारसा मजबुत करण्यासाठी त्यांचे वारसदार खासदार संभाजीराजे
छत्रपती प्रयत्नशील आहेत. या निमित्ताने
दोन्ही देशाचे संपर्क मजबुत होतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वळीवडे येथील शिबिरात राहिलेले पोलंडवासीय
आंद्रेस झिनेक्सी आणि वांदा कोरस्का यांनी आपल्या भावनांना उजाळा दिला. आपल्या
भाषणात त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सर्वांचे
आभार मानले. या सोहळ्याला संयोगिताराजे छत्रपती, शहाजी छत्रपती, कर्नल विजयसिंह
गायकवाड, वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे, गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी, रविराज
निबांळकर, विजय पवार आदींसह वळीवडे, गांधीनगर व कोल्हापुरातील नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
क्षणचित्रे
·
पोलंडवासीयांना फेटे बांधले होते.
·
उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांच्या हस्ते
येथील वृक्षाला पाणी देण्यात आले.
·
उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाची माहिती संकल्पचित्राद्वारे
प्रदर्शीत.
·
मराठमोळा पोशाख घातलेल्या करवीर नादच्या ढोल, ताशा
यांच्या निनादात स्वागत.
·
आरती ओवाळून फुलांच्या वर्षावात पोलंडवासीयांचे
स्वागत.
·
कार्यक्रमस्थळी तिरंगा आणि पोलंडचा राष्ट्रध्वज.
No comments:
Post a Comment