Wednesday, 11 September 2019

वाचन 'सुफळ संपूर्ण'!!!

आपल्या लाडक्या सेलिब्रिटी मंडळींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सर्वांचेच बारीक लक्ष असते. त्यांच्या आवडीनिवडी, सेटवर किंवा त्यांच्या फावल्या वेळात ते विरंगुळ्यासाठी करत असलेल्या गोष्टी, इतकंच नाही तर त्यांच्या खाजगी जीवनातील अनेक गोष्टींवर चाहते लक्ष ठेऊन असतात. अगदी कलाकारांना नेमकं काय वाचायला आवडतं, हेदेखील जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. अशावेळी काही कलाकार आपल्या काही गोष्टी 'टॉप सीक्रेट' ठेवण्याच्या प्रयत्नात असतात, तर काही मंडळी आपले छंद, आवडीनिवडी उघडपणे स्वतःच चाहत्यांना कळवत असतात. 'झी युवा' वाहिनीवरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील सई, अर्थात अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही त्यांच्यापैकीच एक आहे. या मालिकेत सई आणि नचिकेत यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली असली, तरीही या प्रेमकहाणीला 'मराठी भाषेचा आणि मराठीवरील प्रेमाचा' एक सुंदर साज आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय कुटुंबातील मुलीची भूमिका साकारणारी गौरी, स्वतः फार उत्तम मराठी बोलते. तिचा वाचनाचा छंद हे तिच्या शुद्ध आणि उत्कृष्ट भाषेचे मुख्य कारण आहे. या छंदाविषयी ती सर्वांना आवर्जून सांगते. शिवाय तिच्या चाहत्यांना सुद्धा ती वाचन करण्याचे आवाहन करते. मालिकेच्या सेटवर असतांना, नेहमीच एखादे तरी पुस्तक गौरी आपल्याजवळ बाळगते. चित्रीकरणाच्या दरम्यान रिकामा वेळ मिळाला, तर तो वाचन करण्यात घालवण्याचा प्रयत्न असतो. साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे तिचे सर्वांत आवडते पुस्तक आहे. सचिन पिळगावर यांचे 'हाच माझा मार्ग' हे पुस्तक सुद्धा तिच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके पुलं देशपांडे, तसेच प्रवीण दवणे आणि साने गुरुजी हे तिचे आवडते लेखक आहेत. भरपूर वाचनामुळे, तिची भाषा समृद्ध झालेली आहे.

No comments:

Post a Comment