Thursday 30 May 2019

यु.आर.एल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत यु.आर.एल फाउंडेशन तर्फे दरवर्षी सामाजिक गौरव पुरस्कार सोहळासाजरा करण्यात येतो. यंदाचा २०१९ चा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ.जगन्नाथ दीक्षित तसेच श्री.संजय नहार (संस्थापक अध्यक्ष–सरहद्द, पुणे) यांना सामाजिक गौरव पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि प्रत्येकी रुपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अं.नि.स चे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा सामाजिक गौरव पुरस्कार श्री.नंदकिशोर तळाशीलकर (राज्य सरचिटणीस-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा) व मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि रुपये पन्नास हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. शिवाय मुक्ताताई दाभोळकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा) यांनाही त्यांच्या कर्तृत्वासाठी मदतीचा हात देत पन्नास हजार रोख संस्थेकडून देण्यात आले हे विशेष. 
डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ दिल्या गेलेल्या या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना, श्री.नंदकिशोर तळाशीलकर यांनी ‘’डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू राहील’’ असे याप्रसंगी सांगितले. तर मधुमेह आणि लठ्ठपणाविरोधी अभियान चालवणारे डॉ.दीक्षित म्हणाले, ‘’हा पुरस्कार घेताना आनंद तर आहेच पण अशा पुरस्कारांनी जी शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते ती खूप प्रेरणादायी ठरते’’ असं सांगितलं शिवाय श्री.संजय नहार यांनी ‘’यु.आर.एल फाउंडेशनचा मी ऋणी असून त्यांनी आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेतली याबद्दल मी त्यांचे खूप आभार’’ मानत उदयदादा लाड यांचे कौतुक केले.  
या पुरस्कार सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे श्री.हणमंतराव गायकवाड यांनी उदयदादा लाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, ‘’समाजाप्रती जाणीवा असलेल्यांचा हा सन्मान खरोखरचं कौतुकास्पद’’ असल्याचे उद्गार यावेळी काढले. ज्यांच्या पायाशी बसून अजूनही खूप काही शिकता येईल अशांचा सन्मान करणे हा माझ्यासाठी ‘कृतज्ञतेचा दिवस’ असून दिलेल्या या संधीबद्दल उदयदादा लाड व यु.आर.एल फाउंडेशनच्या विश्वस्तांचे आभार मानले.
समाजासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी यु.आर.एल फाऊंडेशनला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे अशा भावना व्यक्त करत यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मा. आ. रामदास फुटाणे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, डॉ. एन. एस. लाड, डॉ. वी. एन. श्रीखंडे, ज्येष्ठ उद्योजक मोहन गोरे आदी दिग्गजांसोबतच शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे, अरुण केदार, विश्वास मोरे, शिवकुमार लाड, सुधारिका लाड हे संस्थेचे विश्वस्त यावेळी आवर्जून उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment