महाराष्ट्राला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. अनेक संत, महात्म्यांचा मोठा वारसा महाराष्ट्रभूमीला लाभला आहे. यापैकीच एक म्हणजे नाथ संप्रदाय. या नाथ संप्रदायाचा मोठा भक्तगण आज महाराष्ट्रभरात विखुरला आहे. नवनाथांच्या महतीचे यथार्थ चित्रण करणारा घन:श्याम येडे दिग्दर्शित ‘बोला अलखनिरंजन’ हा मराठी चित्रपट येत्या २४ मे ला पुन्हा एकदा प्रेक्षक आग्रहास्तव प्रदर्शित होणार आहे. नवनाथांची माहिती आणि महती याचे उत्तम चित्रण या चित्रपटाद्वारे करण्यात आले आहे. या भक्तीमय चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घन:श्याम येडे यांनी सांभाळली असून मातृपितृ फिल्म्स याचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपट निर्मिती आणि त्याचे प्रदर्शन हे निर्मात्यांसाठी नेहमीच जिकरीचे असते अशावेळी तो चित्रपट पुन:प्रदर्शित करणे तर त्याहून कठिण. मात्र एका शेतकरी कुटुंबातून येऊन स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या घन:श्याम येडे यांनी नवनाथांची महती पटवून देण्यासाठी हे आव्हान पेलत चित्रपट पुन:प्रदर्शित केला आहे.
नवनाथांची महती सांगणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. नवनाथांचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित कथांशी सांगड घालत एका शेतकरी कुटुंबातील चैतन्यची नवनाथांवरील श्रद्धा आणि त्यासोबत त्याने पाहिलेले नवनाथांवरील चित्रपटाचे स्वप्न कशाप्रकारे साकार होते, याची रंजक कथा ‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अमोल कोल्हे, सिया पाटील, नागेश भोसले, दिपक शिर्के, दिपाली सय्यद, गायत्री सोहम, मिलिंद दास्ताने, घन:श्याम येडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.
सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घन:श्याम येडे यांनी लिहिले आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज आहे. यांनी आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांनी केले आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे.
आर्थिक अडचणीवर मात करत २४ मे ला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटासाठी प.पु.सद्गुरू वासुदेव महाराज गरुड (श्री क्षेत्र इंदोरी)यांच्या आशीर्वादाने,आणि त्यांचे शिष्य पुंडलिक मच्छिंद्र गरुड (इंदोरी), सोमनाथकाका सोपानराव काळभोर(चिंचवड), गणेशशेठ मधुकरराव भोंडवे(चिंचवड), विक्रमशेठ पोपटराव भेगडे(थेरगाव), संतोष शेठ बबनराव गवारे(मोई), विशालशेठ प्रतापसिंह परदेशी(देहू),निखीलशेठ मच्छिंद्र केदारी(चिंचवड), सौ.संगीता बाबुराव सागावकर(चिंचवड) सौ.उज्ज्वला संतोषशेठ कुंभार नायगावकर(चिंचवड) यांचे मौल्यवान सहकार्य मिळाले आहे.
‘बोला अलखनिरंजन’ २४ मे ला प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment