कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये, 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय झालेला आहे. दर्जेदार गायक, स्पर्धकांसाठी वयाचं नसलेले बंधन, वैभव मांगले आणि सावनी शेंडे असे उत्तम परीक्षक, खुमासदार सूत्र संचालन करणारी मृण्मयी देशपांडे या सगळ्या गोष्टी 'युवा सिंगर'च्या यशात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. उत्कृष्ट गायनकलेच्या जोरावर स्पर्धकांनी ही स्पर्धा आणखी उंचीवर नेली आहे. ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या कार्यक्रमाने, सर्वच स्तरांवर, आपले वेगळेपण जपत यशाचे शिखर गाठले आहे. या स्पर्धेच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे प्रत्येक स्पर्धकाचे असलेले वेगळेपण, हे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरातून, अनेक प्रतिभावंत स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वच स्पर्धक आता तयार झाले आहेत. सर्वोत्तम सादरीकरण करण्यासाठी सगळेच जण मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रतिभावान कलाकारांमध्ये 'एम एच फोक' हा गटदेखील आहे. वेगवेगळ्या शहरामधून ही ८ मंडळी एकत्र आली आहेत. गावं वेगळी असली तरी, लोकसंगीत हा यांना जोडणारा सामान दुवा आहे. लोकसंगीत सर्वांपर्यंत पोचवणे आणि त्याचे जतन करणे, हा 'एम एच फोक' या गटाचा मुख्य उद्देश आहे. 'युवा सिंगर'च्या मंचावर गण, गवळण, सुफी संगीत, लावणी, कोळीगीत, तमाशा, पोवाडा, गोंधळ, भारूड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे लोकसंगीत या ८ जणांनी सादर केलेले आहे. नव्या ढंगात, हे लोकसंगीत तरुणांपर्यंत पोचवण्याचे काम 'एम एच फोक' करत आहे. तरुणांना आपल्या लोकसंगीताविषयी माहिती व्हावी व आवड निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. बॉलीवूड आणि पाश्चिमात्य संगीताचा पगडा तरुणाईवर असताना, 'एम एच फोक'ची लोकसंगीताबद्दलची तळमळ बघून परीक्षक सुद्धा खुश आहेत. त्यांची गुणवत्ता आणि मेहनत परीक्षकांसह प्रेक्षकांना सुद्धा फार महत्त्वाची वाटते आहे. यासाठी त्यांचे नेहमीच कौतुक होत आहे. 'युवा सिंगर एक नंबर'चा विजेता होण्याचे स्वप्न हा गट नक्की पूर्ण करेल, अशी खात्री वाटत आहे.
No comments:
Post a Comment