सर्वांची लाडकी 'झी युवा' ही मराठी वाहिनी, आज तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. निरनिराळ्या दर्जेदार व अनोख्या मालिका झी युवा नेहमी घेऊन येते. अशीच आणखी एक आगळीवेगळी मालिका 'प्रेम, पॉयजन, पंगा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका २८ ऑक्टोबर पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. प्रोमो बघूनच, प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.
'इच्छाधारी नागीण' हा विषय मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच हाताळण्यात येत आहे. 'कोठारे व्हिजन' या मालिकेची निर्मिती करत आहे. 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहायची संधी मिळणार असल्याने, महेशजींच्या ऐवजी, यावेळी आदिनाथ कोठारे निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. निर्मिती क्षेत्रातील पदार्पणातच नवी संकल्पना आदिनाथ कोठारे हाताळणार आहे. वेगळ्या धाटणीची मालिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'इच्छाधारी नागीण' म्हणजे नकारात्मक भूमिका, हे समीकरण बदलून, एक हवीहवीशी प्रेमळ नागीण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेतील कलाकार म्हणून, दोन नवे चेहरे शरयू सोनावणे आणि करण बेंद्रे यांची जोडी या मालिकेत पाहायला मिळतील. प्रेमाच्या या पॉयजनची नशा निर्माण करायला व खूप हासावण्याचा पंगा घ्यायला ही मालिका झी युवा वाहिनीवर आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना नक्की पसंत पडेल.
या मालिकेत व्ही. एफ. एक्स. तंत्रज्ञानाचा फार महत्त्वाचा वाटा असणार आहे. त्या विषयी बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले, "इच्छाधारी नागीण हा विषय असल्यामुळे स्क्रीनवर नागीण दाखवणं हा मुख्य मुद्दा ठरतो. यासाठीच व्ही. एफ. एक्स तंत्राचा वापर करावा लागतो. 'थ्रीडी' ऍनिमेशन करण्यासाठी प्रतिभावंत व्ही. एफ. एक्स. कलाकार लागतात. खूप वेळ आणि पैसे सुद्धा यासाठी खर्च होतात. मालिकेच्या डेडलाईन सांभाळून हे सगळं करणं, हे मोठं आव्हान होतं. पण, आमच्या टीमने ते यशस्वीपणे पेललं आहे. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर झालेला आहे." या मालिकेद्वारे पहिल्यांदा प्रेक्षकांना इच्छाधारी नागीण मराठी टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. याबद्दल आदिनाथ कोठारे सांगतात, "इच्छाधारी नागीण या विषयावर एखादी मालिका सुरु करायची एवढाच विचार डोक्यात होता. पण, या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली, आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं. त्यामुळे हलकीफुलकी पण तरीही 'मॅड' अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. म्हणूनच तिला 'प्रेम, पॉयजन, पंगा' असं निराळं नाव देण्यात आलं. 'इच्छाधारी नागीण' हा विषय वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येतो आहे. एक उत्तम 'सिटकॉम' पाहण्याची संधी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत."
No comments:
Post a Comment