बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर फिल्म ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशा तगड्या स्टारकास्टमूळे ह्या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.
विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण मुंबई आणि पुण्यामध्ये झाले आहे.
चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या निर्मितीची प्रक्रिया चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अतिशय मजेदार होती. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि मोहितसारखा उत्तम दिग्दर्शक ह्यामूळे ह्या सिनेमावर काम करतानाचा अनुभव आठवणीत राहिल. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला उत्सुक आहोत. चित्रपटाची टीम सध्या पोस्ट प्रॉडक्शननंतर हा अद्भूत अनुभव अजून व्दिगुणीत करण्यासाठी झटत आहे.”
दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “माझ्यासाठी ‘मीडियम स्पाइसी’ हा गेल्या काही महिन्यांतला एक अविस्मरणीय अनुभव होता. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची ही प्रक्रिया खूप अव्दितीय आहे. सर्व कलाकारांचा मी आभारी आहे, की त्यांनी ह्या विलक्षण अनुभवात मला उत्तम साथ दिली. आम्ही मुंबई आणि पुण्यात चित्रीकरण केलंय. आजपर्यंत खरं तर अनेक सिनेमांतून आपण मुंबई पाहिलीय. पण ह्या सिनेमात दिसलेली मुंबईची एक आगळी छटा तुम्हांला आवडेल, ह्याचा मला विश्वास आहे. आणि कदाचित हेच तर ह्या शहराचं वैशिष्ठ्य आहे, ते तुम्हांला दरवेळी काही तरी वेगळेपण दाखवतं. पुण्यात चित्रीकरण करताना तर मी ह्या शहराच्या पुन्हा प्रेमातच पडलो.”
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी हे कलाकार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment